spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी बसस्थानकात ‘हिरकणी कक्ष’ : स्तनदा माता व बालकांसाठी सन्मानाची सुरक्षित सुविधा

– महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; महिनाभरात 10 हून अधिक मातांनी घेतला लाभ

कामठी :-  प्रवासादरम्यान स्तनदा मातांना आपल्या बाळांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक स्तनपान करता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा नियोजन समिती, नागपूरच्या जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत कामठी बसस्थानकात अत्याधुनिक प्री-फॅब्रिकेटेड ‘हिरकणी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रवासी महिलांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत असून, सुरू झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात 10 हून अधिक स्तनदा मातांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

कामठी बसस्थानक हे तालुक्याचे प्रमुख केंद्र असल्याने दररोज मोठ्या संख्येने महिला व बालकांचा वावर असतो. मात्र, स्तनपान किंवा बालकांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागेचा अभाव होता. ही गरज लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने हिरकणी कक्षाची उभारणी केली आहे.

या कक्षात मातांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, लहान बालकांसाठी पाळणा, खेळणी, मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच बालसंगोपन व आरोग्यविषयक जनजागृती करणारे माहितीपर फलक लावण्यात आले आहेत. संपूर्ण कक्षाची रचना आकर्षक व स्वच्छ असून माता आणि बालकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

या हिरकणी कक्षाला आज सकाळी 11 वाजता कामठी नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती दिलीपभाऊ बांडेबूचे, माजी नगराध्यक्ष प्रमोद (गुड्डू) मानवटकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी, ज्येष्ठ समाजसेवक शेख सज्जाक, देवानंद कांबळे आदी मान्यवरांनी भेट देऊन सुविधेची पाहणी केली व या उपक्रमाचे कौतुक केले.

महिलांच्या सन्मान, मातृत्वाचा आदर आणि बालकांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा ‘हिरकणी कक्ष’ कामठी बसस्थानकाची एक महत्त्वाची सामाजिक सुविधा ठरत असून, भविष्यात अशा सुविधा अधिक ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.