कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणाळा येथील महावीर नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घर फोडून १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात अवैधरित्या प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोख २ हजार रुपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली.
याप्रकरणी फिर्यादी मनीष ढेंगे (वय ३७, रा. नागपूर) यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.




