spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिरोंजी रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; वृक्षांना राखी बांधून संवर्धनाचा संदेश

खापा, वार्ताहर :- स्थानिक महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या पारंपरिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.

यावेळी ज्या विद्यार्थ्यांना बहीण नाही तसेच ज्या विद्यार्थिनींना भाऊ नाही, अशा विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा अनुभवला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांनाही राख्या बांधून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

रक्षाबंधनाच्या या उपक्रमातून ‘नाती जपा आणि निसर्गही जपा’ असा सुंदर संदेश विद्यार्थ्यांनी दिला. वृक्ष हे मानवी जीवनाचे आधार असून, त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीमध्ये बहीण-भावाच्या नात्याला असलेले अनन्यसाधारण महत्त्व विशद करताना त्यांनी रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून प्रेम, विश्वास, संरक्षण आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा सण असल्याचे सांगितले. तसेच निसर्ग संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करून प्रत्येकाने वृक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून देण्यात आलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश यामुळे विद्यालयातील हा अनोखा उपक्रम प्रेरणादायी ठरला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.