खापा, वार्ताहर :- जिजामाता विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, खापा येथे शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन व राखी मेकिंग कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा सण साजरा करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून भाऊ-बहीणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त केला. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थिनींना भाऊ नाही, अशा विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या आणून त्या विद्यार्थ्यांना बांधल्या. त्यामुळे रक्षाबंधनाचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये द्विगुणित झाला.
यावेळी शाळेच्या प्रांगणातील वृक्षाला विद्यार्थिनींनी राखी बांधून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. ‘वृक्षांचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी वृक्षाशी ऋणानुबंध जोडत पर्यावरणपूरक रक्षाबंधनाचा आदर्श घालून दिला. या उपक्रमातून निसर्गाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य सुधाकर गजभिये, खापा पोलीस स्टेशनचे पीएसआय एकनाथ राठौड, पोलीस शिपाई निलेश गावंडे, गोदरेज फिट बॅक फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र पासवान, शिक्षिका मुक्ता कडू, शिक्षक राजेंद्र भोंगाडे, पंकज बावनकर, आनंद मेनकुदळे, वडे, तसेच पूजा इटनकर, सुरक्षा तितरे व मिनाक्षी तितरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“राखी मेकिंग स्पर्धेतील विद्यार्थिनींचा गौरव”
रक्षाबंधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राखी मेकिंग स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत उत्कृष्ट राख्या तयार करणाऱ्या क्रांती गावंडे, कल्याणी दियेवार, धनश्री घायवट आणि प्रांजली बोरकर यांचा मेडल व शिल्ड देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मोहने यांनी केले, तर आभार प्रदर्शन वर्षा धार्मिक यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, राखी मेकिंगमधील सर्जनशीलता आणि वृक्षाला राखी बांधून दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश यामुळे जिजामाता विद्यालयातील रक्षाबंधन सोहळा विशेष ठरला.





