नागपूर :- सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या देशहिताच्या विचारांना आणि शांततामय आंदोलनाला नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था (NNBS), नागपूर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. केंद्र सरकारने सोनम वांगचूक यांच्याशी सकारात्मक चर्चा करून देशासमोरील विविध समस्यांवर त्यांच्या अनुभवाचा व बुद्धिमत्तेचा उपयोग करून घ्यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे. संस्थेचे प्रवक्ते मनोज मालवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोनम वांगचूक हे एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि बुद्धिजीवी असून त्यांनी देशहितासाठी अनेक विधायक कल्पना मांडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा. पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ज्या प्रकारे समाजहिताच्या आंदोलनांमुळे जनजागृती होते, त्याचप्रमाणे सोनम वांगचूक यांचे आंदोलनही सकारात्मक उद्देशाने सुरू असून सरकारने त्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा. विशेषतः शिक्षण, उद्योग, शेती, परिवहन, रोजगार निर्मिती, क्रीडा तसेच सुरक्षा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या कल्पना उपयुक्त ठरू शकतात, असे संस्थेचे मत आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला १९ दिवस पूर्ण झाले असून त्यांची प्रकृती खालावत असल्याची चिंता संस्थेने व्यक्त केली आहे. अनेक मान्यवरांनीही त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी, केंद्र सरकारने तातडीने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थेने केली आहे. या पत्रकावरील संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोखरे, संस्थापक अध्यक्ष रवी गाडगे पाटील आणि प्रवक्ते मनोज मालवी यांची नावे नमूद आहेत.
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला नव निर्माण बहुउद्देशीय संस्थेचा नागपुरातून जाहीर पाठिंबा









