– चांदणी बर्डी येथील श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रमालगतच्या नदीपात्राकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; लोकेश काळे यांचा इशारा
मेंढला प्रतिनिधी :- नरखेड तालुक्यातील श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम, चांदणी बर्डी येथे दरवर्षी श्रावण महिना आणि ऋषिपंचमीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. उत्तरवाहिनी नदीत पवित्र स्नान करून भाविक धार्मिक विधी पार पाडतात. मात्र यंदा आश्रमालगतच्या नदीपात्राची अत्यंत दयनीय अवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे भाविकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नदीचे खोलीकरण करण्यात आले असले तरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर काळा चिकण गाळ साचला आहे. त्यामुळे नदीत उतरणे अत्यंत धोकादायक बनले आहे. अनेक ठिकाणी काटेरी झुडपे, गवत आणि अस्वच्छता पसरली असून भाविक गाळात अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते.
दरवर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी १५ ते २० हजारांहून अधिक भाविक या ठिकाणी स्नान, दर्शन आणि महाप्रसादासाठी उपस्थित राहतात. आश्रम परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि विविध आध्यात्मिक उपक्रम पार पडतात. मात्र नदीघाटाची झालेली दुर्दशा पाहता यंदा भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
खरेदी-विक्री संस्थेचे संचालक लोकेश विनोद काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नदीघाटातील गाळ काढून परिसर स्वच्छ करावा, काटेरी झुडपे हटवावीत, सुरक्षित स्नानघाट तयार करावा, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स व सूचना फलक लावावेत, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
भाविकांच्या श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि धार्मिक परंपरेचा विचार करून प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर ऋषिपंचमीच्या दिवशी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशाराही लोकेश काळे यांनी दिला आहे.
हजारो भाविकांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या या पवित्र स्थळाकडे प्रशासनाने केवळ कागदी कामापुरते न पाहता प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामे पूर्ण करावीत, अशी मागणी भाविकांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.




