spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राम मंदिर चोरीप्रकरणी संसदेत चर्चेची मागणी; सुरक्षा व्यवस्थेवर उपस्थित झाले प्रश्न

– राज गेडाम यांची भूमिका

कामठी :- अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित चोरीच्या घटनेवर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राज गेडाम यांनी केली आहे. ही घटना केवळ चोरीची नसून कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावनांशी निगडित असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज गेडाम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीराम मंदिर हे देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असून अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्या असतील, तर त्या उघड करून जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या विषयावर संसदेत चर्चा करून संपूर्ण सत्य देशासमोर आणावे, तसेच दोषींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

याशिवाय देशातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेऊन आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही यंत्रणा, नियमित सुरक्षा लेखापरीक्षण आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

धार्मिक स्थळांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती संपूर्ण देशाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, या संवेदनशील विषयाकडे राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन पाहण्याची आणि संसदेत सकारात्मक व विधायक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन राज गेडाम यांनी केले.

Popular Articles