spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उफाळला; १५ दिवसांत बोनस न दिल्यास तहसीलवर जनआंदोलन

– रामटेक काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

कामठी :- धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला प्रति हेक्टर ५० हजार रुपयांचा बोनस अद्यापही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कामठी-रामटेक विधानसभा काँग्रेसच्या वतीने मौदा येथे प्रशासनाला निवेदन देत तातडीने बोनस वितरित करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, मौदा, रामटेक, पारशिवनी आणि कामठी तालुक्यातील हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. बोनस वितरणातील विलंबामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रलंबित बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, येत्या १५ दिवसांत बोनस वितरित न झाल्यास तहसील कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्यास तयार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर,माजी जी प सदस्य देवेंद्र गोडबोले, ओबीसी काँग्रेस नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, मौदा तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, बाजार समिती सभापती राजेश ठवकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles