spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दर्जेदार आरोग्य सेवांच्या दिशेने मनपाचे आणखी एक पाऊल;झिंगाबाई टाकळी व जयताळा आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन सुरू

– गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांच्या दृष्टीने मनपाचा महत्त्वपूर्ण उपक्रम

– डॉ. अंजना तिवारी व डॉ. प्रशांत एच. व्ही. यांच्या चमूकडून झिंगाबाई टाकळी केंद्राची तपासणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत मंगळवारी झोनमधील झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या आरोग्य सुविधांचे राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन मानकांनुसार (NQAS – National Quality Assurance Standards) मूल्यांकन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने केंद्र शासनाने गठित केलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन समितीचे सदस्य डॉ. अंजना तिवारी आणि डॉ. प्रशांत एच. व्ही. यांनी झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन सुरू केले आहे. त्यानंतर समितीतील अन्य सदस्य डॉ. मेहंदी हसन आणि डॉ. रवी चिंथाला हे दि. २४ व २५ जुलै रोजी लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन मानकांनुसार परीक्षण करून मूल्यांकन करतील.

हा उपक्रम नागपूर महानगरपालिकेच्या महापौर  निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय आरोग्य सभापती मनिषा अतकरे, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड आणि साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्या देखरेखीखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बुधवारी (दि. २२) झिंगाबाई टाकळीनागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय मूल्यांकन समितीच्या सदस्यांचे नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान, शहर गुणवत्ता समन्वयक डॉ. राजेश बुरे, झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नदीम खान,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. चैती हटवार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मूल्यांकनामध्ये झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी), लसीकरण, माता व बाल आरोग्य सेवा, प्रयोगशाळा, औषधालय, आरोग्य सल्ला सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग व्यवस्थापन यासह एकूण १२ आरोग्य सेवांची राष्ट्रीय गुणवत्ता मानकांनुसार सखोल तपासणी करण्यात येणार आहे.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी राष्ट्रीय मूल्यांकन समितीला नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा सातत्याने प्रयत्नशील आहे. मागील वर्षी कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणांकन प्राप्त झाले असून, मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनीही ही गुणवत्ता प्राप्त करावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी समितीला आवश्यक ती माहिती अचूक व वेळेत उपलब्ध करून द्यावी तसेच मूल्यांकन प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देशही डॉ. दीपक सेलोकर यांनी दिले.

यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता डॉ. अंजना तिवारी आणि डॉ. प्रशांत एच. व्ही. यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आरोग्य सुविधांची गुणवत्ता वस्तुनिष्ठपणे तपासणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट असून, संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडली जाईल, अशी ग्वाही डॉ. अंजना तिवारी यांनी दिली.

तर डॉ. प्रशांत एच. व्ही. यांनी रुग्णसेवा हेच प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. मूल्यांकनाच्या संपूर्ण कालावधीतही रुग्णसेवेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले

झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रीय मूल्यांकनकर्तांचे मनपाद्वारे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याची सादरीकरणाद्वारे माहिती दिली व संचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. नदीम खान यांनी केले.

Popular Articles