spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजधानीत मराठी भाषा – संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली :- मराठी भाषेचा जागतिक विस्तार करण्यासह देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. यासाठी कार्य करणाऱ्या दिल्लीतील सर्व मराठी मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्यसभा खासदार रामराव वडकुते, कर्नाटकचे चे आमदार डॉ.मारोतीराव मुळे,महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि समन्वयक लेशपाल जवळगे यांसह दिल्ली व परिसरातील मराठी मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत दिल्लीतील मराठी मंडळींचे संघटन, सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन, तसेच मराठी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये सुमारे साडेचार लाख मराठी भाषिक वास्तव्यास असून त्यांनी राजधानीत आपले स्वतंत्र सांस्कृतिक अस्तित्व निर्माण केले असल्याचे सांगितले. मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक व संस्थात्मक पाठबळ मिळावे, अशी मागणी त्यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठी भाषा विभाग हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जागतिक स्तरावर मराठीचा विस्तार करण्यासाठी कार्यरत आहे. परदेशात ७५ आंतरराष्ट्रीय मंच आणि देशात ७५ बृहन्महाराष्ट्र मंडळांचे जाळे उभारण्याचे काम सुरू असून, कर्नाटक सीमाभागातील मराठी ग्रंथालयांसाठी दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

दिल्लीतील ३० ते ५० लहान-मोठ्या मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी ‘मध्यवर्ती समिती’ स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून गणेशोत्सवासह विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध मंडळाच्या प्रतिनिधी यांनी त्यांची भूमिका विषद केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.