spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई :- आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासह सर्व आवश्यक सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील आश्रमशाळा व वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार राजेश पाडवी तसेच दूर दृश्य प्रणाली द्वारे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, अमरावती विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत तसेच प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, अधीक्षक, गृहपाल तसेच संबंधित विभागातील अधिकारी सहभागी झाले होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छ परिसर, शुद्ध पिण्याचे पाणी, सकस व दर्जेदार भोजन उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. स्वच्छतेच्या अनुषंगाने व तसेच इतर बाबींबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आवश्यक नियोजन करावे. प्रत्येक आश्रमशाळेला प्रकल्प अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या साहित्याचा संपूर्ण तपशील गुगल शीट वर अद्ययावत भरावा, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज करावे.

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच विविध उपक्रमांची प्रभावी प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी सकारात्मक काम समाजापर्यंत पोहोचल्यास आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

Popular Articles