गडचिरोली :- जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह, गडचिरोली येथे विशेष आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांना जागतिक हेपाटायटिस दिनाचे महत्त्व, यकृताच्या आरोग्याचे संरक्षण, हेपाटायटिस-बी व हेपाटायटिस-सी या आजारांची कारणे, संसर्ग होण्याचे मार्ग, लक्षणे, वेळेवर निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नियमित आरोग्य तपासणी, सुरक्षित वैद्यकीय पद्धतींचा अवलंब, लसीकरणाचे महत्त्व आणि संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. यानंतर कारागृहातील कैद्यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक आरोग्य सल्ला देण्यात आला तसेच पात्र लाभार्थ्यांना हेपाटायटिस-बी प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हेपाटायटिस हा योग्य वेळी निदान व उपचार केल्यास नियंत्रणात ठेवता येणारा आजार आहे. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, आवश्यकतेनुसार हेपाटायटिस-बीचे लसीकरण करून घ्यावे आणि संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित आरोग्यविषयक सवयींचा अवलंब करावा. शासनाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांच्या माध्यमातून हेपाटायटिसमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने कार्यरत आहे
सदर कार्यक्रमास डॉ. वर्षा लहाडे (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. अंबरीश तिवारी (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. मनीष मेश्राम (भिषक वर्ग-१), श्रीमती उत्तरा फेबुलवार (सहाय्यक अधिसेविका), डॉ. अनुपम महेशगौरी (वरिष्ठ सल्लागार), डॉ. दिनेश रोकडे (आयुष विभाग), डॉ. प्रेरणा राऊत (NCD विभाग), महेश भांडेकर (DAPCU), श्रीमती विशाखा काटवले (अर्श समन्वयक), किशोर मोडक (ICTC समुपदेशक), पूजा शेडमाके (NVHCP औषध निर्माता), धीरज उंदीरवाडे (NVHCP पीअर सपोर्टर), डॉ. मृणाली रामटेके (रुग्णालय व्यवस्थापक), HLL टीम, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा खुले कारागृह, गडचिरोली यांच्यावतीने सुभाष सोनवणे (अधीक्षक), वैभव आत्राम (वरिष्ठ कारागृह अधिकारी), शामराव गीते तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निता बालपांडे यांनी केले, तर दिनेश खोरगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास, हेपाटायटिस-बी प्रतिबंधक लसीकरणाला चालना मिळण्यास तसेच संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक संदेश समाजापर्यंत पोहोचण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती, तपासणी व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी यावेळी सांगितले.





