spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात आनंदात साजरा झाला गुरुपौर्णिमा उत्सव

खापा, वार्ताहर :- व्ही एस पी एम अकॅडमीद्वारे संचालित खापा स्थित जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर गजभिये तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक देवेंद्र धुंदे, प्राध्यापक पंकज बावनकर, प्राध्यापिका वर्षा सेलोकर, प्राध्यापिका सहारे उपस्थित होते.

वर्ग अकरावी आणि बारावीच्या खुशी श्रीरामे, मिताली नेवारे, प्रियल कोचे, दियेवार, अश्विनी शेंडे, आयुष, कार्तिक यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुरूंच्या मार्गदर्शनातूनच आम्हाला जीवनाचा योग्य मार्ग सापडणार आहे, अशा भावनाही अनेक विद्यार्थ्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. अध्यक्ष म्हणून बोलताना मुख्याध्यापक गजभिये यांनी यशस्वी जीवनासाठी शिस्तप्रिय असणे आवश्यक असल्याचा गुरुमंत्र विद्यार्थ्यांना दिला तर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्राध्यापक देवेंद्र धुंदे यांनी संत कबीरांचे “गुरु गोविंद दोऊ खडे”असेअनेक दोहे सांगून विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात गुरूंचे स्थान परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण गुरूनेच आपल्याला परमेश्वरांची ओळख करून दिल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सदैव गुरुप्रती कृतज्ञता ठेवायला हवी व भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संघर्षातून खडतर प्रवास करीत आपल्या जीवनात यश प्राप्त करणाऱ्या आदर्शाचा शोध घेण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.

प्राध्यापक बावनकर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतील आचारसंहिता समजावून सांगितली तर प्राध्यापिका वर्षाचे लोकर व सहारे यांनीही विद्यार्थ्यांना गुरु प्रतीचे महत्त्व समजावून दिले. विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून भेटवस्तू श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गुरुस्थानी असलेल्या आपल्या शिक्षकांचा सत्कार केला. अतिशय सुंदर अशा या गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व स्वागत गीताने झाली तर सलग दोन तास सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग बारावीची विद्यार्थिनी कुमारी शर्वरी पांडे हिने तर आभार प्रदर्शन वर्ग अकरावीची विद्यार्थिनी हिमानी तुमाने हिने केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.