– ‘एक पेड गुरु के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांनी व्यक्त केले गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व
पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे नेटवर्क
राजोली :- चंद्रभागा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, राजोली येथे गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा गुरुवार, दि. ३० जुलै रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरुचे असलेले सर्वोच्च स्थान अधोरेखित करताना विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘एक पेड गुरु के नाम’ या संकल्पनेला अनुसरून शालेय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून गुरुचे महत्त्व विशद केले. गुरु हे केवळ ज्ञानदान करणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देणारे, त्यांच्यामध्ये सुसंस्कार, नैतिक मूल्ये आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना रुजविणारे खरे शिल्पकार असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एखादा कुंभार जसा मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन आकर्षक मूर्ती घडवितो, त्याचप्रमाणे गुरु विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन त्यांच्या भविष्याची भक्कम पायाभरणी करतात. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती सहज उपलब्ध होत असली तरी त्या ज्ञानाचा विवेकपूर्ण व विधायक उपयोग करण्याची प्रेरणा गुरुच देतात. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने चांगल्या विचारांची जोपासना करून सुसंस्कारित जीवन जगण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांनी पुढे सांगितले की, प्रत्येकाच्या आयुष्यात लाभलेले गुरु हे जीवनाला प्रकाशमान करणारे दीपस्तंभ असून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि सन्मानाची भावना कायम जपली पाहिजे. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी यशस्वी नागरिक म्हणून घडतात आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतात.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





