spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएमश्री’ चा डोलारा, आत खड्ड्यांचा पसारा! नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयाच्या रस्त्याची दुर्दशा; समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नवेगावबांध :-  केद्र सरकारच्या अतिमहत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘पीएमश्री’ या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा समावेश करून गुणवत्तेचा मोठा डिंडोरा पिटला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या नामांकित विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि कॅम्पस परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या भलामोठ्या खड्ड्यांमुळे या दाव्यांची पुरती पोलखोल झाली आहे. शिक्षणाचा आणि पायाभूत सुविधांचा ‘अग्रणी दर्जा’ असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्यांना चिखल आणि डबक्यांतून मार्ग काढावा लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रवेशद्वारावरच तलावाचे स्वरूप!

नवोदय विद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या अगदी प्रवेशद्वारासमोर रस्त्याची इतकी भीषण चाळण झाली आहे की, पहिल्याच पावसात तेथे चिखलाचे साम्राज्य आणि पाण्याचे तलाव साचले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. शाळा परिसरात चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पाय घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

‘पीएमश्री’च्या निधीचा वापर कुठे?

‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीतून शाळांचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु, नवोदय विद्यालय समिती व स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवासात खड्ड्यांचे आणि डबक्यांचे ‘ग्रहण’ सहन करावे लागत आहे. मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना शिक्षक, कर्मचारी आणि पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

विद्यालय समितीचे ‘जाणीवपूर्वक’ दुर्लक्ष?

शाळेतील या दयनीय अवस्थेकडे विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, ते डोळ्यांवर झापडे ओढून बसले आहेत का? असा थेट सवाल आता पालक आणि नागरिकांमधून विचारला जात आहे. विद्यालयाचे मुख्य द्वार आणि अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यासाठी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागरिक व पालकांची मागणी:

कॅम्पसमधील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करून पक्का आणि सुरक्षित रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा या निष्काळजीपणाविरोधात लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

‘पीएमश्री’ नावाला तरी शोभेल असे काम करा, कागदावरचा विकास रस्त्यावर उतरवा!

— संतप्त पालक व ग्रामस्थ, नवेगावबांध.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.