spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संतवाङ्मयाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव

– मुक्तेश्वर आश्रमात ‘संपूर्ण उपासना व भजन’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

नागपूर :- सोमलवाडा येथील श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात प.पू. बाबा महाराज यांनी रचलेल्या दिव्य भजनांचा, संपूर्ण उपासना व भजन संहितेचा समावेश असलेल्या ‘संपूर्ण उपासना व भजन’ या आकर्षक पुस्तकाचे प्रकाशन भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. संतवाङ्मयाची अमूल्य परंपरा जपणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश एदलाबादकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुक्तेश्वर आश्रमाचे अध्यक्ष समीर खरे होते. विशेष अतिथी म्हणून नितीन तापस व अशोक तापस उपस्थित होते. राम गर्गे यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रेणुका करंदीकर यांनी केले. मार्गदर्शन करतांना प्रकाश एदलाबादकर यांनी सांगितले की, संतवाङ्मय हे समाजाला आध्यात्मिक मूल्यांशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. संतांनी रचलेले अभंग, गाथा, मनाचे श्लोक आणि इतर साहित्य हे केवळ भक्तीसाठी नसून संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरले आहे. या पुस्तकातील उपासना आणि भजने साधकांना आत्मशोध, आत्मजागृती आणि ईश्वरभक्तीचा सुंदर अनुभव देणारी असून त्यामधून आध्यात्मिक ऊर्जा व चैतन्याची अनुभूती मिळते, असे त्यांनी नमूद केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माची चेतना जागृत करण्यासाठी, साधनेची प्रेरणा देण्यासाठी आणि प्रत्येक साधकाला योग्य दिशा दाखविण्यासाठी हे पुस्तक प्रभावी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रकाशन सोहळ्यास आश्रमाचे पदाधिकारी, भाविक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुस्तक आध्यात्मिक साधनेसह समाजप्रबोधनासाठीही महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त केदार ‘गणेशसुत’ अभ्यंकर यांच्या ‘तुला पाहताना’ या भक्तिगीताचेही सादरीकरण करण्यात आले. गौरी सोमलवार, दीप्ती मुंजे, हृदया बडे, प्रचिती सहस्त्रबुद्धे, डॉ. अरुणा जगताप, भालचंद्र साठे, सतीश बल्लाळ यांनी गीत सादर केले. गोविंद गडीकर व विवेक लोहकरे यांनी साथसंगत केली, तर आभार अमित गोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव श्याम पोहनकर, विवेक प्रतापे, शशिकांत वाघमारे, शार्दूल महावादीवार, अमन लुंबा यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

Popular Articles