spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकशाहीचे धडे: लाखनी येथील वाघाये महाविद्यालयात ‘बॅलेट पेपर’ पद्धतीने निवडणूक

– राज गिऱ्हेपुंजे व मानसी उके यांची बाजी

हंसराज,भंडारा लाखनी :- विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडला जावा, या उद्देशाने स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालय, लाखनी येथे विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे, ही निवडणूक पारदर्शक ‘बॅलेट पेपर’ (मतपत्रिका) पद्धतीने घेऊन लोकशाहीचा आदर्श घालून देण्यात आला.

दिनांक २६ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २७ जुलै रोजी निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत महाविद्यालयातील एकूण १५ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. यामध्ये १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी राज गिऱ्हेपुंजे याने सर्वाधिक ८२ मते मिळवून शानदार विजय संपादन केला. मुलींमधून मानसी उके हिने ८० मते मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

या निवडणुकीत दिव्या किंदरले, भावेश वाघाये, दीपक ढेंगे, वेदांती बोरकर, नुपूर गोधूळे, प्राची बागडे, भावना नान्हे, धनश्री लांडगे, कार्तिक उके, मंथन भोतमांगे, महेश गायधने आणि वैष्णवी वाघाये या उमेदवारांनीही निवडणूक लढवून आपले प्रतिनिधित्व सिद्ध केले.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन प्राचार्य डॉ. गणेश कापसे आणि प्रा. मनीषा सपाटे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केले. ‘प्रिसाईडिंग ऑफिसर’ (Praising Officer) म्हणून डॉ. अनुराधा खाडे व डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी जबाबदारी सांभाळली. मतदान अधिकारी (Polling Officer) म्हणून प्रा. स्मिता तितरमारे, ज्ञानेश्वरी रहांगडाले, प्रा. मंगेश कुकडे, प्रा. येसोमती कागदे, प्रा. स्वप्नील गाढवे, प्रा. उमरकर, प्रा. मुनेश्वर हलमारे आणि प्रा. कवी सूर्यवंशी यानी कामकाज पाहिले. बीएलओ (BLO) म्हणून सुनील भोयर यांनी चोख कामगिरी बजावली.

सध्याच्या काळात निवडणुकांच्या पारदर्शकतेवर चर्चा होत असताना, महाविद्यालयाने बॅलेट पेपर पद्धतीने निवडणूक घेऊन एक वेगळा संदेश दिला आहे. कुठलाही दबाव न येता किंवा मत चोरीला न जाता योग्य उमेदवाराची निवड या माध्यमातून झाली, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. लोकशाही प्रक्रिया समजून घेण्यासाठी अशा निवडणुका विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Popular Articles