spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पोस्टात खाते उघडण्याची अफवा; पोस्ट विभागाने तात्काळ खुलासा करावा – उमेश मोहतुरे यांची मागणी

हंसराज,भंडारा :- शासनाच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे अनिवार्य असल्याची अफवा सध्या ग्रामीण भागात वेगाने पसरत आहे. यामुळे कोथुर्णा, इंदुरखा, खैरी, लावेश्वर आणि खमाटा टाकडी या परिसरातील महिलांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, पोस्टात खाते उघडण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, पोस्ट विभागाने अधिकृत खुलासा करून नागरिकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहतुरे यांनी केली आहे.

सध्या जिल्ह्यात भात रोवणीची कामे जोमाने सुरू आहेत. शेतकरी आणि महिला शेतमजूर कामात व्यस्त असतानाच, “पोस्टात खाते उघडले तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील,” अशी चर्चा गावागावांत पसरली आहे. यामुळे कामाचा वेळ सोडून महिला पोस्ट ऑफिसच्या चकरा मारत असल्याचे चित्र दिसत आहे.

काय म्हणतात पोस्ट अधिकारी? या संदर्भात पोस्ट विभागाचे अधिकारी भुरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट केले की, पोस्ट विभागाकडून कोणावरही खाते उघडण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. मात्र, लाडकी बहीण योजना, पीएम किसान, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, कलाकार मानधन अशा विविध योजनांसाठी संबंधित पर्याय (टिक) निवडून खाते उघडण्याची सुविधा पोस्टात उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत सूचना नसताना पसरलेल्या या अफवेमुळे महिलांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर बोलताना उमेश मोहतुरे म्हणाले, “जर लाडकी बहीण योजनेसाठी पोस्ट खाते अनिवार्य असल्याचा कोणताही शासन निर्णय असेल, तर तो विभागाने सार्वजनिक करावा. जर असा कोणताही नियम नसेल, तर पोस्ट विभागाने तात्काळ जाहीर प्रकटन देऊन अफवा थांबवाव्यात. नागरिकांच्या प्रतिसादाअभावी योजनांच्या नावाखाली खाते उघडण्यासाठी असा संभ्रम निर्माण केला जात आहे का, याचीही स्पष्टता होणे आवश्यक आहे.”

पोस्ट खाते उघडणे आवश्यक असेल तर नागरिक नक्कीच सहकार्य करतील, परंतु चुकीच्या माहितीमुळे शेतीकामाच्या दिवसांत महिलांची होणारी ओढाताण थांबवावी. पोस्ट विभागाने यावर भूमिका स्पष्ट न केल्यास नागरिकांमध्ये अधिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही मोहतुरे यांनी पत्रातून कळवले आहे.

Popular Articles