spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा शहराच्या आकाशात दुहेरी इंद्रधनुष्याचे अद्भुत दर्शन; सप्तरंगी कमानींच्या नयनरम्य छटांनी नागरिक भारावले

खापा, वार्ताहर :- दिवसभर अधूनमधून बरसलेल्या पावसाच्या सरींनंतर शुक्रवारी (दि.३१ जुलै) सायंकाळी खापा शहराच्या आकाशात दुहेरी इंद्रधनुष्याचे दुर्मिळ आणि मनोहारी दर्शन घडले. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर उमटलेल्या दोन सप्तरंगी कमानींनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या निसर्गरम्य दृश्याने खापेकरांना काही काळासाठी मंत्रमुग्ध केले.

इंद्रधनुष्य दिसताच नागरिकांनी घरांच्या गच्च्या, रस्ते, मोकळी मैदाने आणि विविध ठिकाणांहून या अद्भुत दृश्याचा आनंद घेतला. युवक-युवतींसह अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा अविस्मरणीय क्षण टिपला. काही मिनिटांतच दुहेरी इंद्रधनुष्याचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

पावसाच्या थेंबांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या अपवर्तन, परावर्तन आणि वर्णविक्षेपामुळे दुहेरी इंद्रधनुष्याची निर्मिती होते. मुख्य इंद्रधनुष्याच्या वर दिसणारी दुसरी फिकट रंगांची कमान हा दुर्मिळ नैसर्गिक आविष्कार मानला जातो. खापा शहरात असे दृश्य पाहण्याची संधी मिळाल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते.

ज्येष्ठ नागरिकांनीही अशा दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन क्वचितच घडत असल्याचे सांगत निसर्गाच्या या अप्रतिम कलाकृतीचे मनापासून कौतुक केले. काही काळ आकाशात खुललेल्या या सप्तरंगी कमानींनी वातावरण अधिक प्रसन्न केले आणि नागरिकांना निसर्गसौंदर्याचा अविस्मरणीय अनुभव दिला.

Popular Articles