हंसराज,भंडारा सिहोरा :- मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बावनथडी नदीच्या काठावर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेली महत्त्वाकांक्षी ‘सोंड्या टोला उपसा सिंचन योजना’ पुरेशा पाणीसाठ्याअभावी सध्या बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करून तिचे पाणी चांदपूर जलाशयात वळवण्यात यावे, अशी मागणी तुमसर पंचायत समितीचे उपसभापती सुभाष बोरकर यांनी केली आहे. पाणी असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे ही योजना ठप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चांदपूर जलाशयाची स्थिती चिंताजनक इंग्रजकालीन असलेला आणि ‘ग्रीन व्हॅली’ म्हणून ओळखला जाणारा चांदपूर जलाशय भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जलाशय आहे. या जलाशयावर ५२ गावांतील सुमारे ९ हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. मात्र, सध्या या जलाशयात केवळ ११ ते १२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील धान पिकावर मोठे संकट ओढवले असून शेतकरी चिंतेत आहेत.
प्रशासकीय अनास्थेवर ठपका सोंड्या टोला योजनेत एकूण ८ पंप असून त्यापैकी ६ पंप सुस्थितीत आहेत. बावनथडी नदीत पाणी उपलब्ध असतानाही हे पंप का चालवले जात नाहीत, असा सवाल सुभाष बोरकर यांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी या पंपांच्या साहाय्याने पाणी चांदपूर जलाशयात सोडले जाते, परंतु यंदा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
आंदोलनाचा इशारा पाण्याची पातळी पाहता सध्या २ ते ३ पंप सहज सुरू करता येणे शक्य आहे. जर वेळेत पाणी सोडले गेले नाही, तर पिकांचे प्रचंड नुकसान होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने पंप सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा गर्भित इशारा सुभाष बोरकर यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया: “सध्या चांदपूर जलाशयात १५ ते १६ टक्के जलसाठा आहे. उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उचलण्यासाठी वरिष्ठ स्तरावर परवानगी मागितली आहे. ८ ते १० ऑगस्टपर्यंत पाणी उचलण्याची कार्यवाही प्रत्यक्ष सुरू होईल.”
— ए. ए. ढोके, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, तुमसर.





