spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कत्तलीसाठी नेली जाणारी २१ जनावरे तुमसर पोलिसांनी पकडली; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा तुमसर :- कत्तलीच्या उद्देशाने २१ जनावरांची अत्यंत निर्दयतेने अवैध वाहतूक करणाऱ्या एका आयसर ट्रकवर तुमसर पोलिसांनी मध्यरात्री थरारक पाठलाग करून मोठी कारवाई केली. खापा चौकात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी आंध्रप्रदेशातील एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, २९ जुलै रोजी पहाटे २:४५ वाजताच्या सुमारास तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मौजा खापा चौकात नाकाबंदीवर तैनात होते. यावेळी माडगीकडून येणाऱ्या ६ टायर असलेल्या आयसर ट्रक क्रमांक KL-63/E-7481 ला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून वाहन न थांबवता भंडारा रोडच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. पोलिसांनी तात्काळ सरकारी वाहनाने या संशयास्पद ट्रकचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर अडवले. ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये ५ लाल रंगाचे बैल, ६ काळसर पांढऱ्या रंगाचे बैल आणि १० पांढऱ्या रंगाचे बैल असे एकूण २१ बैल अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयतेने कोंबलेले आढळून आले. या जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता केवळ कत्तलीच्या उद्देशाने नेले जात असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईमध्ये पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपये किमतीची २१ जनावरे आणि १५ लाख रुपये किमतीचा आयसर ट्रक, असा एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ट्रक चालक कोटा प्रेम कुमार (वय २६ वर्ष, रा. अप्पानवेडु, पोस्ट हनुमान जंक्शन, जिल्हा वेस्ट गोदावरी, राज्य आंध्रप्रदेश) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर तुमसर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) (घ) (च) (झ), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ९ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सदरची धडाकेबाज कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसरचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक आढाव, पोलीस हवादार प्रफुल गावंडे, पोलीस शिपाई देवानंद हलमारे आणि चालक पोलीस शिपाई भुमेश्वर पटले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Popular Articles