spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘वनार्टी’मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात

नागपूर :- लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रशांत वावगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. औपचारिक शिक्षणाची संधी जवळपास मिळाली नाही, मात्र जिद्द, प्रतिभा आणि समाजाविषयीची प्रखर बांधिलकी यांच्या बळावर त्यांनी मराठी साहित्यविश्वात अजरामर ठसा उमटविला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास थेट जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला. कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी वंचित, श्रमिक आणि उपेक्षित समाजाचा आवाज बुलंद केला. ‘फकीरा’ ही त्यांची कादंबरी आजही मराठी साहित्याचा मैलाचा दगड मानली जाते. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तीच्या साहित्याचा गौरव थेट रशियासारख्या देशात होतो, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचेही मा. प्रशांत वावगे यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रकल्प व्यवस्थापक डॉ. चेतन बन्सोड यांच्यासह ‘वनार्टी’चे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.