spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना अभिजात सन्मान मिळावा – जयदीप कवाडे

पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे भव्य सामाजिक रॅली; अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना शासनाच्या धोरणांत स्थान देण्याची मागणी

नागपूर :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नागपुरात भव्य सामाजिक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दीक्षाभूमी येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीचा समारोप अण्णाभाऊ साठे चौक येथे झाला. रॅलीपूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयदीप कवाडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर वंचित, शोषित, श्रमिक, भटक्या-विमुक्त समाजाच्या संघर्षाला शब्दबद्ध करणारे सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांच्या स्मृतींना केवळ औपचारिक अभिवादन न करता त्यांना अभिजात सन्मान मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब शासनाच्या धोरणांमध्ये दिसले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. कवाडे यांनी राज्य शासनाकडे अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील ऐतिहासिक वास्तूला स्मारकाचा दर्जा देण्याची जोरदार मागणी केली. ही वास्तू त्यांच्या संघर्षमय जीवनाची साक्ष असून ती प्रेरणास्थळ म्हणून विकसित व्हावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला समर्पित भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून त्या प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. सध्या अनेक योजना निधीअभावी अपेक्षित परिणाम साधू शकत नाहीत. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या विकासासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी. जयदीप कवाडे यांनी वडार, बंजारा, पारधी, कंजरभाट, गोंधळी तसेच इतर भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. शिक्षण, रोजगार, उद्योग, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमात बोलताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्त समाजाला संघर्षाची दिशा दिली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. रॅलीदरम्यान “अण्णाभाऊ अमर रहे”, “सामाजिक न्याय आमचा हक्क आहे”, “अण्णाभाऊ यांच्या विचारांना शासनमान्यता द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने युवक, महिला आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, शहराध्यक्ष कैलास बोंबले, शहर कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी, शहर महासचिव दिलीप पाटील, पूर्व विदर्भ महासचिव डॅनी शामकुंवर, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष स्वप्निल महाल्ले, दक्षिण-पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष श्रेयस गडले, प्रवेश ठवरे, प्रजोत कांबळे, सोमेश काले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जयदीप कवाडे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा सन्मान केवळ घोषणांमधून किंवा सोशल मीडियावरील पोस्टमधून होणार नाही. त्यांच्या विचारांना शासनाच्या धोरणांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये आणि विकासाच्या योजनांमध्ये स्थान मिळाले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तनाचा लढा आणखी व्यापक व निर्णायक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.