spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर साहस स्मरण सप्ताहानिमित्त प्रेरणादायी व्याख्यान

नागपूर :- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूरतर्फे दरवर्षी ८ जुलै हा दिवस “साहस दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने संपूर्ण जुलै महिन्यात नागपूरातील विविध शाळांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रकार्य, क्रांतिकारी विचार व प्रेरणादायी जीवनचरित्राचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी अभ्यासू व्याख्यात्यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत ३१ जुलै रोजी, सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटीच्या प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर, नागपूर येथे सुप्रसिद्ध व्याख्यात्या व सावरकर अभ्यासक शुभा साठे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अद्वितीय जीवनकार्य, राष्ट्रभक्ती, साहस, त्याग आणि स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदान याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी हे व्याख्यान उत्स्फूर्तपणे ऐकत विविध प्रश्न विचारून संवादही साधला. यावेळी राजेंद्र बेनोडेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रप्रेरणादायी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र कागभट तसेच शाळेच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन भालचंद्र कागभट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या वंदना कुलकर्णी, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी व्याख्यात्या शुभा साठे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी राष्ट्रप्रेम, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देणाऱ्या या व्याख्यानाचे कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.