हंसराज,भंडारा :- राज्यातील सर्पमित्र जीव धोक्यात घालून वन्यजीव संरक्षण आणि मानवी जीव सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहेत. मात्र, या सर्पमित्रांना कोणतेही नियमित मानधन, विमा किंवा शासकीय संरक्षण उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्पमित्रांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अभय रंगारी यांनी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सर्पमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या घरातून किंवा शेतातून साप पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडतात. यामुळे जैवविविधता आणि परिसंस्थेचे संतुलन राखण्यास मदत होते. मात्र, अनेक सर्पमित्रांना स्वतःच्या खर्चाने प्रवास करावा लागतो आणि अपघाताचा धोका पत्करावा लागतो. ही परिस्थिती विचारात घेता, नोंदणीकृत सर्पमित्रांना नियमित मानधन मिळावे आणि त्यांना अधिकृत ओळखपत्र देऊन जिल्हास्तरावर नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वनविभागामार्फत सर्पमित्रांसाठी प्रमाणित प्रशिक्षण आणि नियमित उजळणी वर्गांचे आयोजन करण्याची गरजही निवेदनात व्यक्त केली आहे. तसेच, साप पकडण्यासाठी आवश्यक आधुनिक उपकरणे, सुरक्षा कीट आणि संरक्षक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास आरोग्य विमा, सर्पदंश उपचारांसाठी विशेष योजना आणि मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर अधिकृत नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन सुरू करून त्यात सर्पमित्रांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनात आहे. सर्पमित्रांच्या नावाखाली होणारी वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी कठोर नोंदणी आणि देखरेख यंत्रणा उभारण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यासोबतच, पर्यावरण संरक्षणात चांगले काम करणाऱ्या सर्पमित्रांचा शासन स्तरावर गौरव करावा आणि नागरिकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ जनजागृती मोहीम राबवावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
सर्पमित्रांकडून अभय डी. रंगारी यांचे आभार
सर्पमित्रांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्यातील अनेक सर्पमित्रांनी अभय डी. रंगारी यांचे आभार मानले आहेत. सर्पमित्रांना शासनाकडून योग्य संरक्षण आणि सुविधा मिळण्यासाठी ही निवेदनाची प्रक्रिया महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.





