spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चार महिन्यांच्या संघर्षाला यश; चिंगी मार्गावर अखेर एसटी धावली !

– विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न मार्गी; शाळा, पालक आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

पंकज परशुरामकर ,इनसाइड न्युज टुडे प्रतिनिधी

नवेगाव बांध :- विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या चार महिन्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले. सातत्यपूर्ण पाठपुरावा, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे साकोली–चिंगी–खोबा–नवेगाव बांध या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा सोमवार (दि. ३ ऑगस्ट) पासून सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणाचे चिंगी व परसोडी (रैयत) येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बसचे आगमन होताच चालक व वाहकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, परसोडी (रैयत) येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत १६६ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये ९४ मुले व ७२ मुलींचा समावेश आहे. चिंगी, खोबा आणि कोकणा येथील ४१ विद्यार्थी दररोज या शाळेत ये-जा करतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विविध उपक्रम आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणामुळे या शाळेला पालकांची विशेष पसंती आहे. मात्र, वाहतुकीच्या सुविधेअभावी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही समस्या सोडविण्यासाठी एप्रिल २०२६ पासून बस सेवा सुरू करण्यासाठी व्यापक पाठपुरावा करण्यात आला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार राजकुमार बडोले आणि विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या शिफारसपत्रांसह पालकांच्या स्वाक्षरीयुक्त निवेदने, शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव आणि आवश्यक कागदपत्रे साकोली आगारात सादर करण्यात आली. याशिवाय चार ते पाच वेळा प्रत्यक्ष भेट देऊन आगार प्रमुख चोपकर यांच्यासमोर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची गंभीर समस्या मांडण्यात आली.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत अखेर एसटी प्रशासनाने साकोली–चिंगी–खोबा–नवेगाव बांध मार्गावर बस सेवा सुरू केली. चिंगी गावात प्रथमच एसटी बस दाखल होताच ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “आमच्या गावात प्रथमच एसटी आली; हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

त्यानंतर बस चिंगी व खोबा येथील विद्यार्थ्यांना घेऊन परसोडी (रैयत) येथे पोहोचली. तेथे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत चालक-वाहकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या बस सेवेसाठी किशोर शेंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तसेच सुभाष कटाने, जागेश्वर कोरे, देवराम कोरे, सपना शामकुवर, शारदा कापगते , अशोक बन्सोड (निवृत्त शिक्षक), गोविंदा चचाने , वीरेंद्र भिवगडे , तालेश्वर निवारे , सुरज वाढई , यादवराव जेंगटे (पोलीस पाटील), चिरंजीव रंगारी, मधू भेंडारकर तसेच ग्रामस्थांनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून बस सेवा सुरू केल्याबद्दल खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार राजकुमार बडोले, विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, साकोली आगार प्रमुख चोपकर, चालक-वाहक तसेच संपूर्ण एसटी प्रशासनाचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

या बस सेवेच्या प्रारंभामुळे चिंगी, खोबा, कोकणा, नवेगाव बांध आणि पांढरवाडी (रैयत) परिसरातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत आहे. गावभर या निर्णयाचे स्वागत होत असून शाळेच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.