spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ

– 8 कोटींच्या रथाचे नुकसान

सोलापुर :- संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुबंधू आणि मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखीच्या परतीच्या प्रवासाला यंदा खराब रस्त्यांमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. माढा तालुक्यातील उपळवटे ते करमाळा तालुक्यातील केम या मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सोहळ्याचे विश्वस्त राहुल साळुंखे यांनी सांगितले.

गेल्या 2022 पासून याच मार्गावरील खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि हजारो वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, माढा ते करमाळा या मार्गावर रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, बैलांना होणारा त्रास टाळण्यासाठी परंपरेला छेद देत पालखीचा रथ ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढण्याची वेळ आली आहे.

खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवास ठरला खडतर

पालखी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी असल्याने रथ पुढे नेणे अत्यंत कठीण झाले. त्यामुळे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. या खडतर प्रवासाचा फटका केवळ रथालाच नव्हे, तर हजारो वारकऱ्यांनाही बसला. अनेक वारकरी चिखलात घसरून पडले असून काहींना किरकोळ दुखापती झाल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.

आठ कोटींच्या चांदीच्या रथाचे नुकसान

या खराब रस्त्यावरून जाताना संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सुमारे आठ कोटी रुपये किमतीच्या चांदीच्या रथाचे मोठे नुकसान झाले आहे. रथाचे अनेक भाग गळून पडल्याचा दावा सोहळा विश्वस्तांनी केला असून, या नुकसानीमुळे वारकरी संप्रदायात संतापाची भावना व्यक्त होत आहे.

‘रस्ता सुधारला नाही तर पालखीचा मार्ग बदलू…’

राहुल साळुंखे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, यावर्षी पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही, तर पुढील वर्षापासून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घ्यावा लागेल. माढा ते करमाळा या मार्गावरील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, त्याचा फटका मानाच्या पालखी सोहळ्यांनाही बसत आहे. शासन आणि प्रशासनाकडून पालखी मार्गांच्या विकासाबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मार्ग आजही खड्डेमय आणि धोकादायक असल्याची टीका वारकरी आणि दिंडी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पालखी परंपरेचा मान राखण्यासाठी हा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Popular Articles