spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याचा वेगाने विस्तार

• 2030 पर्यंत 300 किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

मुंबई :- राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे. सध्या राज्यात 174 कि.मी. मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून 291 कि.मी. मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय 130 कि.मी. मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत असून 87.15 कि.मी. मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे.

राज्यात ₹2,80,755 कोटींचे मेट्रो प्रकल्प होत असून यामध्ये केंद्र शासनाचा एकूण हिस्सा ₹27,216 कोटी, तर राज्य शासनाचा थेट हिस्सा ₹50,250 कोटी आहे. याशिवाय एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांच्या माध्यमातून ₹75,729.62 कोटींचे आर्थिक नियोजन केले जाणार आहे. उर्वरित निधी शासन हमी कर्जाद्वारे उभारणी करण्यात येईल. काही प्रकल्प पूर्ण, तर काही प्रगतिपथावर व मंजुरीच्या टप्प्यात एकूण आहेत. अशी माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली.

एकूण 683 कि.मी. लांबीचे मेट्रो मार्ग

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये एकूण 428.89 कि.मी., पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) मध्ये 169.45 कि.मी. आणि नागपूर महानगर प्रदेश (एनएमआर) मध्ये 85.20 कि.मी. मेट्रो नेटवर्क विकसित होत असून राज्यातील एकूण प्रस्तावित व कार्यान्वित मेट्रो जाळ्याची लांबी 683.53 कि.मी. इतकी आहे.

राज्य शासनाने वर्षनिहाय नियोजन केले आहे. यामध्ये मुंबई, पुणे व नागपूरमधील विविध मेट्रो मार्गांचा विकास करण्याचे निश्चित केले असून या वर्षभरामध्ये 87 कि.मी. व 56 स्थानके आणि 2029-30 मध्ये नियोजित पैकी 302 कि.मी. व 161 स्थानके उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

मेट्रो 10 मार्गाची उभारणी लवकरच

यावेळी बैठकीत एमएमआर प्रदेशातील मीरा गाव ते गायमुख या मेट्रो-10 मार्गासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. या मेट्रो मार्गासाठी नोटिफिकेशन यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले होते.

नियोजन व आवश्यक परवानगीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून यासाठी 8 हजार पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ९.६८ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील पाच इलेव्हेटेड स्टेशन असतील. या मेट्रो 10 मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण व्हावे या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

भविष्यातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्प

राज्य शासनाने नवीन मेट्रो मार्गांचे नियोजन केले आहे, त्यामध्ये पुढील मेट्रो मार्गाचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो-11 (अणिक डेपो–वडाळा–गेटवे ऑफ इंडिया) – 17.51 कि.मी.

हडपसर–लोणी काळभोर व हडपसर–सासवड रोड – 16.68 कि.मी.

नवी मुंबई मेट्रो-1ए व 2 (बेलापूर–सागर संगम व पेंधर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) – 17.09 कि.मी.

कान्हान नदी–कान्हान सिटी (नागपूर फेज-2 विस्तार) – 1.45 कि.मी.

मुंबई मेट्रो-8 (सीएसएमआयए–एनएमआयए) – 34.90 कि.मी.

मुंबई मेट्रो-10 (गायमुख–छत्रपती शिवाजी महाराज चौक) – 9.20 कि.मी.

मुंबई मेट्रो-13 (शिवाजी चौक–वसई-विरार) – 25.03 कि.मी.

मुंबई मेट्रो-12A (मानपाडा–कल्याण–खुटारी–तळोजा) – 18.40 कि.मी.

मुंबई मेट्रो-3 विस्तार (कफ परेड–नवी नगर) – 1.40 कि.मी.

मुंबई मेट्रो-14 (कांजूर–बदलापूर) – 45.15 कि.मी.

पुणे मेट्रो फेज-3 (निगडी–वाकड–नाशिक फाटा–चाकण) – 42.00 कि.मी.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.