spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवयवदान पंधरवाडा निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

गडचिरोली :- अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने अवयवदान पंधरवाडा निमित्त आज दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीला गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्राणोती निंभोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करून मृत्यूनंतर अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. एका अवयवदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे. मृत्यूनंतर अवयवदानाचा संकल्प करून अनेकांना नवजीवन देण्याची संधी प्रत्येकाने स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके यांनी “मरावे परी कीर्तिरूपी उरावे” या उक्तीचा उल्लेख करून प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

यावेळी वर्ग–१ भिषक तज्ज्ञ डॉ. मनीष मेश्राम यांनी कोणकोणते अवयव दान करता येतात, अवयवदानाची प्रक्रिया कशी असते तसेच त्याबाबतच्या आवश्यक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर रोटरी क्लब चे मदन जीवाणी, सहाय्यक अधिसेविका  फेबुलवार आणि सहाय्यक अधिसेविका बावणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमांचा सूत्र संचालन दिनेश खोरगडे केले तर राहुल कंकनालवार यांनी आभार प्रदर्शन केले. आणि या कार्यक्रमाचा यशस्वी करीता डॉ. प्रेरणा राऊत, डॉ. मृणाली रामटेके, विजय सीडाम, मीना दिवटे, राहुल चावरे, मुकेश भरधाडकर , वैशाली बोबाटे, शिल्पा मेश्राम, शीतल काळबांधे तसेच भूपेश दरडमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , अधिपरिसेविका अधिपरिचारिका, नर्सिंग कॉलेज विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.

Popular Articles