spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मूग, उडीद पीक स्पर्धेला मुदतवाढ १० ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार

नागपूर :- मूग व उडीद पीक स्पर्धेला शासनाने मुदतवाढ दिली असल्यामुळे आता यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना १० ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.

राज्यामध्ये पीक उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही पीक स्पर्धा घेतली जाते. आजवर या पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने व्हायची. मात्र प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता येण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम २०२६ पासून ऑनलाइन संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.

अन्नधान्य, कडधान्य, व गळीतधान्यासाठी राज्य स्तरावर पीक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेत सहभागी होऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सूयर्फूल अशा ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येईल. मूग व उडीद या पिकांसाठी ३१ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती, मात्र पीक स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे एकवेळची विशेष बाब म्हणून या वर्षी उडीद व मूग या पीक स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत १० ऑगस्ट २०२६ अशी करण्यात आली आहे.

पात्रता निकष

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता निकष आहेत, १) शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावाने जमीन असावी व ती जमीन तो स्वतः कसत असावा, २) एकावेळी अनेक पिकांच्या स्पर्धेत भाग घेता येईल. ३) ज्या पिकाच्या स्पर्धेत भाग घेतला आहे, त्या पिकाची स्वतःच्या शेतात किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड केलेली असावी.

आवश्यक कागदपत्रे

फार्मर आयडी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याची पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), बँक खाते- पासबूक यांचा तपशील.

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भूईमूग व सूयर्फूल या पीक स्पर्धेत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सहभागी होता येईल. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पीक स्पर्धा टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.