spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बेपत्ता असलेल्या निहालचा रेल्वे रुळांवर अंत; एका आईची प्रतीक्षा कायमची संपली

कामठी :- घराबाहेर पडलेला मुलगा सुखरूप परत येईल, या आशेने डोळ्यांत आसवे आणि मनात हजारो प्रश्न घेऊन वाट पाहणाऱ्या एका आईची प्रतीक्षा अखेर बुधवारी कायमची संपली. रनाळा परिसरातील पॅराडाईज लॉनच्या मागील नागपूर-हावडा डाउन रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक लागून १४ वर्षीय मोहम्मद निहाल शफी शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

शहीद नगर, रनाळा येथील रहिवासी असलेला निहाल कामठीतील एका शाळेत शिक्षण घेत होता. मागील सहा दिवसांपासून तो शाळेत जात नव्हता. मंगळवारी आईने त्याला शाळेत न जाण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर तो शांतपणे जेवण करून घराबाहेर पडला; मात्र तो पुन्हा कधीच घरी परतला नाही.

रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात त्याचा आटोकाट शोध घेतला. प्रत्येक फोन, प्रत्येक दाराची टकटक आणि प्रत्येक पावलाचा आवाज निहालचाच असेल, अशी आशा होती. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

बुधवारी दुपारी रनाळा येथील पॅराडाईज लॉनच्या मागील रेल्वे रुळांवर एका किशोराचा मृतदेह पडल्याची माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

रुग्णालयात पोहोचलेल्या नातेवाईकांनी मृताची ओळख मोहम्मद निहाल शफी शेख अशी पटविली. त्या क्षणी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एका निष्पाप मुलाच्या अकाली जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण रनाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके करीत आहेत.

Popular Articles