spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अखेर मृत्यूशी झुंज हरली… सुरक्षारक्षकाच्या निधनाने तीन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

कामठी :- आयुष्यभर इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकाची अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले विकेश माटे (वय ४५, रा. कुंभारे कॉलोनी) यांचे डोक्यातील नस फुटल्याने उपचारादरम्यान बुधवारी रात्री दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने पत्नीसह तीन निष्पाप चिमुकल्यांच्या आयुष्यात दुःखाचा काळोख दाटला असून संपूर्ण परिसर हळहळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विकेश माटे यांची प्रकृती अचानक बिघडली. तपासणीत त्यांच्या डोक्यातील नस फुटल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रुग्णालयात अत्यंत प्रामाणिक, शांत आणि कर्तव्यनिष्ठ सुरक्षारक्षक म्हणून त्यांची ओळख होती. चेहऱ्यावर कायम हसू आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे विकेश माटे आज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी समजताच सहकारी, मित्रपरिवार आणि परिचितांवर शोककळा पसरली.

घराचा कर्ता पुरुष निघून गेल्याने माटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. वडिलांच्या मायेची सावली हरपलेल्या त्या चिमुकल्यांकडे पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, “कर्तव्य निभावत जगलेला माणूस निघून गेला; पण मागे आयुष्यभराची वेदना सोडून गेला,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

Popular Articles