spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’! १० जणांना बेड्या, साडेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखेची हनुमान वॉर्डात धाडसी कारवाई; जुगारींमध्ये उडाली मोठी खळबळ

भंडारा :- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून, भंडारा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हनुमान वॉर्ड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी १० जुगारांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकींसह एकूण ३,६५,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त माहितीवरून रचला सापळा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवाल्दार भोंगाडे यांना हनुमान वॉर्डातील राहुल कटवार यांच्या घराशेजारी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी सापळा रचला आणि अचानक छापा टाकला. यावेळी काही लोक ताशपत्तीवर पैसे लावून हार-जीतचा खेळ खेळताना आढळून आले. पोलिसांनी या परिसरातून जुगाराचे साहित्य आणि मोठा मुद्देमाल हस्तगत केला.

पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे या कारवाईत पोलिसांनी रोशन पुरन खेडकर (३६, कुंभार टोली), गोपाल राजेश सोनेकर (२५, आंबेडकर वॉर्ड), बॉबी संजय कटकवार (२९, हनुमान वॉर्ड), किरण नामदेव मदनकर (३०, संत कबीर वॉर्ड), शाहिद शरीफ शेख (२६, तकिया वॉर्ड), प्रतिक रमेश नागपुरे (२७, संत कबीर वॉर्ड), मारोती रामदास मोहनकर (३८, संत कबीर वॉर्ड), मुकेश विजय मेश्राम (३३, संत कबीर वॉर्ड), मनोज गुलाबराव शेंदरे (३६, कुंभार टोली) आणि साहिल बबलु सोनेकर (२९, चांदनी चौक, भंडारा) या १० जणांना ताब्यात घेतले आहे.

साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १,०२,००० रुपये किमतीचे ९ नग मोबाईल, २,२०,००० रुपये किमतीच्या ४ मोटरसायकली, जुगाराच्या फळावरील ७,५०० रुपये रोख आणि आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेले ३५,७०० रुपये असा एकूण ३,६५,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्रमांक १६९१/२०२६ नुसार कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवाल्दार भोंगाडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा शहर पोलीस अधिकारी करत आहेत.

Popular Articles