spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना अभिवादन

– सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 9 ऑगस्ट रोजी मुंबईत देशभक्तीपर नृत्य – संगीतमय कलाकृतीचे आयोजन

मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर नृत्य-संगीतमय कलाकृतीचे आयोजन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटीजवळ, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून, राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या हाकेमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा मिळाली. ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, शौर्य, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा ऐतिहासिक दिवस आहे. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘वंदे मातरम्’ या नृत्य-संगीतमय कलाकृतीतून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे अतुलनीय योगदान, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहे. संगीत, नृत्य आणि नाट्यात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, राष्ट्रनायकांचे कार्य आणि भारतीय संविधानातील राष्ट्रीय मूल्यांची जपणूक नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सदर कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रभावनेचा जागर करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे.

मुंबई व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, युवक, सांस्कृतिकप्रेमी आणि रसिकांनी या प्रेरणादायी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.