spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापौरांनी केली कळमना मार्केट यार्डची पाहणी

नागपूर :- कळमना बाजारात कचरा कुजून त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. तसेच पर्यावरणाची देखील हानी होत आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करीत परिसरातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी असे सक्त निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच लकडगंज झोनमधील कऱ्हाळे नगर, भरतवाडा परिसरातील नाग नदीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराची महापौर निता ठाकरे यांनी गुरुवारी (ता. ०६) पाहणी केले. पाहणी दरम्यान मनपाचे सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन, अतिरिक्त आयुक्त अंकित, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, नगरसेवक प्रदीप पोहणे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार कृषी उत्पन्न बाजार समिती प्र.उपसचिव रमेश चवरे, धनराज बागडे उपस्थित होते.

कळमना बाजार येथील डंपिंग यार्डमध्ये भाजीपाला व फळांचा मोठ्या प्रमणात सेंद्रिय कचरा साचलेला असून तो कुजल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे जवळपासच्या वस्तींमधील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर साचलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने तातडीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले. यासोबतच भविष्यात अशा प्रकारे कचरा साचणार नाही, यासाठी दीर्घकालीन व शास्त्रोक्त नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी याठिकाणी यापुढे नवीन कचरा टाकला जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तर मनपा आयुक्तांनी मार्केट यार्ड मध्ये कचरा डम्पिंग करण्याबद्दल नाराजी व्यक्त करीत संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यानंतर महापौरांनी लकडगंज झोन अंतर्गत कऱ्हाळे नगर, भरतवाडा परिसरातील नाग नदीची पाहणी केली. नदीकाठी संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी घरांमध्ये शिरून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन नदीकाठी तातडीने संरक्षण भिंत उभारण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.