– एकाला अटक; न्यायालयाने सुनावली १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई करत बुनकर कॉलोनी परिसरातील एका दुकानावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ५० किलो गोवंशीय मांस, लोखंडी चाकू, लाकडी कुंदा आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.२० ते ११.३० वाजताच्या दरम्यान ढोर दवाखान्याच्या बाजूला असलेल्या बुनकर कॉलोनी परिसरातील फिजिओथेरपी सेंटरसमोरील एका दुकानात गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी पीएसआय अक्षय झगडे यांना पथकासह घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी पंचांसमक्ष दुकानाची झडती घेतली असता अंदाजे ५० किलो गोवंशीय मांस आढळून आले. त्याची अंदाजे किंमत १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच एक लोखंडी चाकू, लाकडी कुंदा आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा साहित्यसाठाही जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शहबाज कमाल (२३), दानीश कमाल (१७) आणि राशीद कमाल (५०) सर्व राहणार शेख बुनकर कॉलोनी कामठी यांच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील शहबाज कमाल याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मांसाची कायदेशीर तपासणी तसेच प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अक्षय झगडे, पोउपनि योगेश नायटे, एएसआय किशोर महंत, पोशि सुरज ठाकूर, आशिष बागडे आणि विवेक दोसेटवार यांच्या पथकाने केली.
प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि योगेश नायटे करीत आहेत





