spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेशनसाठीची पायपीट अखेर थांबली!

– खराशी-गुमगावच्या नागरिकांना आता गावातच मिळणार धान्य; आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

– मनिष काटोले यांच्या मागणीची तहसील प्रशासनाकडून दखल; ८० ते ९० लाभार्थ्यांना मोठा दिलासा

मेंढला प्रतिनिधी :- रेशनच्या धान्यासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारी सावंगा येथे जाण्याची वेळ येत असल्याने खराशी व गुमगाव येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. वृद्ध, महिला, दिव्यांग आणि गोरगरीब लाभार्थ्यांना रेशनसाठी करावी लागणारी पायपीट आता अखेर थांबणार आहे. आता खराशी आणि गुमगाव येथील नागरिकांना त्यांच्या गावातच रेशनचे धान्य मिळणार आहे.

लोहारा व जुनेवाणी या गावांमध्ये आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या शिफारशीनुसार दरमहा गावातच रेशन धान्य वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर खराशी व गुमगाव येथेही गावातच धान्य वाटप सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन्ही गावांतील सुमारे ८० ते ९० रेशन लाभार्थ्यांनी लेखी तक्रार करून आपली अडचण भाजपा जलालखेडा मंडळाचे उपाध्यक्ष मनिष वासुदेवराव काटोले यांच्याकडे मांडली.

वाहनाअभावी लाभार्थ्यांची ससेहोलपट

खराशी व गुमगाव येथील नागरिकांना धान्य घेण्यासाठी लोहारी सावंगा येथे जावे लागत होते. ग्रामीण भागात वेळेवर वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वृद्ध व महिलांना मोठी पायपीट करावी लागत होती. अनेकदा रेशन दुकान बंद असल्यास किंवा इतर कारणाने धान्य मिळाले नाही तर नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते.

रेशनसारख्या अत्यावश्यक शासकीय सुविधेसाठी नागरिकांना एवढ्या दूर जावे लागू नये, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली होती.

मनिष काटोले यांच्या पाठपुराव्याला यश

नागरिकांची समस्या लक्षात घेऊन मनिष काटोले यांनी तातडीने काटोल-नरखेड मतदारसंघाचे आमदार चरणसिंगजी ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे खराशी व गुमगाव येथे गावातच रेशन धान्य वाटप सुरू करण्याची मागणी केली.

आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सौ. निलिमाताई सतीशजी रेवतकर, सदस्य दक्षता समिती, नागपूर जिल्हा, तसेच मनिष काटोले यांनी तहसील प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीची प्रशासनाने सकारात्मक दखल घेत खराशी व गुमगाव येथे गावातच रेशन धान्य वाटप करण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

असे असेल रेशन वाटपाचे वेळापत्रक

तहसीलदारांच्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकानदार श्री. तपेश्वर रगतपुरे हे ई-पॉस (e-PoS) मशीनद्वारे गावातच धान्य वाटप करणार आहेत.

खराशी : दर महिन्याला ११ व १२ तारीख

गुमगाव : दर महिन्याला १३ व १४ तारीख

त्यामुळे आता या दोन्ही गावांतील लाभार्थ्यांना रेशनसाठी लोहारी सावंगा येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

प्रवासाचा खर्च अन् वेळही वाचणार

गावातच रेशन धान्य उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा खर्च, वेळ आणि श्रम वाचणार आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी गावपातळीवरच सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

“नागरिकांची अडचण सोडवणे हाच पाठपुराव्याचा उद्देश”

“खराशी आणि गुमगाव येथील जवळपास ८० ते ९० लाभार्थी माझ्याकडे लेखी तक्रार घेऊन आले होते. चार-पाच किलोमीटर दूर जाऊन रेशन आणताना वृद्ध, महिला व गोरगरीब नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आमदार चरणसिंग ठाकूर साहेबांकडे तातडीने मागणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तहसील प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला. आता गावकऱ्यांना गावातच रेशन मिळणार असल्याचा मनापासून आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया मनिष वासुदेवराव काटोले यांनी व्यक्त केली.

खराशी व गुमगाव येथील नागरिकांची वर्षानुवर्षांची समस्या मार्गी लागल्याने दोन्ही गावांमध्ये समाधानाचे वातावरण असून, नागरिकांनी आमदार चरणसिंग ठाकूर, निलिमाताई रेवतकर, मनिष काटोले आणि तहसील प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Popular Articles