– ‘महाज्योती’चा सातवा वर्धापन दिन उत्साहात
नागपूर :- शिक्षण हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून समाजाच्या परिवर्तनाची सर्वांत प्रभावी शक्ती आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करून महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारताच्या सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी केली. त्यांच्या विचारांना आजच्या काळातील गरजांशी जोडत बहुजन समाजातील युवक-युवतींना शिक्षण, प्रशिक्षण आणि संधी देण्याचे कार्य ‘महाज्योती’ करीत आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याने पेटविलेल्या शिक्षणक्रांतीची आधुनिक वाटचाल म्हणजे ‘महाज्योती’ असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा ज्येष्ठ नाट्यकलावंत शैल जैमिनी कडू यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती)चा सातवा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्या उद्घाटनीय भाषणात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून गोवारी समाज अंमलबजावणी व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा कैलाश राऊत, ‘महाज्योती’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वनार्टीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, तसेच ‘महाज्योती’च्या सहायक लेखा अधिकारी वर्षा अहिर उपस्थित होत्या.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे बोलतांना शैल जैमिनी कडू म्हणाल्या, फुले दाम्पत्याने ज्या काळात शिक्षणाचा अधिकार समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघर्ष केला, त्या संघर्षाचा केंद्रबिंदू केवळ शाळा सुरू करणे नव्हता, तर माणसाला विचार करण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देणे हा होता. आजच्या काळात त्याच विचारांना कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन आणि रोजगाराच्या संधींची जोड देणे आवश्यक आहे. ‘महाज्योती’ हे काम संस्थात्मक पातळीवर पुढे नेत असून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचेही शैल जैमिनी कडू यांनी नमूद केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना ‘महाज्योती’च्या कार्याचा गौरव केला. तसेच संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

🟦 शब्द, रंग अन् बुद्धीची रंगली मैफल
‘महाज्योती’च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्य व विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धेत सहभागी कर्मचाऱ्यांनी शिक्षण, समता, स्त्रीशिक्षण आणि समाजपरिवर्तनाचे विचार प्रभावीपणे मांडले. रांगोळी स्पर्धेत सामाजिक संदेशांना कलात्मक अभिव्यक्ती मिळाली, तर बुद्धिबळ स्पर्धेत डावपेच आणि बुद्धीची चुरस रंगली. एक मिनिटांच्या मनोरंजक खेळांनी कार्यक्रमात उत्साहाची भर पडली. विविध स्पर्धांतील विजेत्यांसह वर्षभर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी धम्मा गजभिये यांनी केले तर चैताली खडतकर यांनी आभार मानले.





