– अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर :- साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्ट चिंचभवन, नागपूर च्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ चतुरस्र साहित्यिक नव्हते, तर ते क्रांतिकारक समाजसुधारक होते. आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना वाचा फोडून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अरविंद डोंगरे यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लेखन प्रेरणा दिनानिमित्त साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्ट च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन १ ऑगष्टला करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहानु इंगळे होते. प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून लक्ष्मी हत्तीठेले, नगरसेविका तथा सभापती, दुर्बल घटक समिती, मनपा नागपूर उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून करण्यात आली. प्रारंभी नवोदित गायकांनी सादर केलेल्या कराओके गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर प्रमुख वक्त्यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी ‘अण्णाभाऊ साठे यांचा जीवनसंघर्ष आणि आजचे वास्तव’ या विषयावर अरविंद डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रविंद्र खांडेकर आणि देवेंद्र काटे यांनी विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महादेव जाधव, सुधा बावणे, प्रभाकर शिंदे, अंबादास कुचेकर आणि विनायक इंगोले यांचा समावेश होता. तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल गायक सुनील वाघमारे, गिटारवादक राकेश वानखेडे आणि तबलावादक अशोक डोके यांना ‘समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाला डी.एम. कावळे, नत्थूजी उकुंडे, रविंद्र वानखेडे, सुचेता कांबळे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर (नानाजी) प्रधान, मुख्य सचिव अशोक हटवार, मनिष वानखेडे, क्रांती भावे, रमेश इंगोले, योगेश धनकासार आणि ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.





