– अभियोजन पक्षाला आरोप वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयश; बचाव पक्षाच्या प्रभावी युक्तिवादाला यश
खापा, वार्ताहर :- सावनेर पोलिस स्टेशन अंतर्गत सन २०२४ मध्ये दाखल झालेल्या पॉक्सो प्रकरणात नागपूर येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने प्रशिक उर्फ दादू भांगे व नरेंद्र भांगे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निकालात अभियोजन पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले.
या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. करण बिहाऊत यांनी प्रभावीपणे बाजू मांडत अभियोजन पक्षाच्या पुराव्यातील महत्त्वाच्या बाबींवर न्यायालयाचे लक्ष वेधले. फिर्यादीच्या जबाबातील विसंगती, उलट तपासणी दरम्यान समोर आलेल्या महत्त्वपूर्ण कबुल्या, स्वतंत्र साक्षीदारांचा अभाव तसेच पॉक्सो कायद्याच्या संबंधित तरतुदींशी निगडित महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे बचाव पक्षाने ठोसपणे मांडले.
खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांची आणि बचाव पक्षाने उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांची न्यायालयाने सखोलपणे छाननी केली. अभियोजन पक्षाकडून सादर करण्यात आलेला पुरावा आरोपींना दोषी ठरविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर विश्वासार्ह व पुरेसा सिद्ध झाला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
फौजदारी खटल्यात आरोपीचा दोष वाजवी शंकेपलीकडे सिद्ध होणे आवश्यक असते. या निकषाच्या अनुषंगाने अभियोजन पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.
या निकालामुळे बचाव पक्षाने मांडलेल्या कायदेशीर बारकावे, साक्षी-पुराव्यातील विसंगती आणि उलटतपासणीतील महत्त्वपूर्ण बाबींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या खटल्यात ॲड. करण बिहाऊत यांना ॲड. रेणुका शेलके व ॲड. महेश गभणे यांनी मोलाचे सहकार्य केले.





