सावनेर :- भविष्यातील अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडाव्यात म्हणून कष्टाची कमाई बँकेत सुरक्षित ठेवली जाते. मात्र, खातेदाराच्या परवानगीशिवाय बँक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढली गेल्याचे निदर्शनास आल्याने खातेदाराला जबर धक्का बसला आहे. बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेतील खाते क्रमांक 871710110012226 मधून दि. 10 जून ते 30 जून 2026 या कालावधीत सुमारे 8 लाख 73 हजार रुपये परस्पर काढण्यात अथवा हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी शुक्रवार, दि. 7 ऑगस्ट रोजी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शुभम दशरथ ढवळे (वय 28, रा. कोटोडी, पोस्ट माळेगाव, ता. सावनेर, जि. नागपूर) यांचे बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेत खाते क्रमांक 871710110012226 आहे. त्यांनी दि. 29 ऑगस्ट 2013 रोजी हे खाते उघडले असून, तेव्हापासून या खात्यातून आर्थिक व्यवहार करीत आहेत. त्यांची शेती वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या आदासा खाण प्रकल्पासाठी संपादित झाल्यामुळे त्याबदल्यात मिळालेली रक्कम त्यांनी बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेतील सदर खात्यात जमा केली होती. त्यामुळे खात्यात सुमारे रु. 8 लाख 73 हजार इतकी रक्कम जमा होती.ढवळे सध्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, भांडेवाडा खाण, वणी नॉर्थ येथे नोकरीस असून, त्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेत आहे. दैनंदिन आर्थिक गरजांसाठी ते प्रामुख्याने त्या खात्याचा वापर करीत असल्याने बँक ऑफ इंडियातील सदर खात्यातील रक्कम नियमितपणे काढत नव्हते.पासबुक अपडेट करताच धक्कादायक प्रकार उघडदि. 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता अधिक रकमेची आवश्यकता भासल्याने ढवळे बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेत गेले. त्यांनी पासबुकमध्ये व्यवहारांच्या नोंदी करून घेतल्या असता, खात्यात एकही रुपया शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.यानंतर त्यांनी बँक शाखेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक 9764421543 हा त्यांच्या परवानगीशिवाय बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा मोबाईल क्रमांक कधी, कोणाच्या विनंतीवरून व कोणत्या प्रक्रियेद्वारे बदलण्यात आला, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती अथवा पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे ढवळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.त्यानंतर बँक शाखेकडून खात्याचे स्टेटमेंट घेऊन पाहणी केली असता, दि. 10 जून ते 30 जून 2026 या कालावधीत खात्यातून सलग अनेक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. या व्यवहारांद्वारे सुमारे रु. 8 लाख 73 हजारांची रक्कम अज्ञात व्यक्तीने कोणतीही परवानगी अथवा संमती न घेता काढली अथवा हस्तांतरित केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.सदर व्यवहार आपण स्वतः केलेले नसून, कोणत्याही व्यक्तीस आपल्या खात्यातून रक्कम काढण्याची किंवा हस्तांतरित करण्याची परवानगी दिलेली नाही, असे ढवळे यांनी स्पष्ट केले आहे. खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांक संमतीशिवाय बदलणे आणि त्याच कालावधीत खात्यातून मोठ्या रकमेचे अनधिकृत व्यवहार होणे, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मोबाईल क्रमांक बदलाची चौकशी करण्याची मागणी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने बँक खात्याचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोबाईल क्रमांक 9764421543 कोणाच्या विनंतीवरून, कोणत्या दिवशी व कोणत्या प्रक्रियेद्वारे बदलण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच दि. 10 ते 30 जून या कालावधीत खात्यातून झालेल्या सर्व संशयास्पद व अनधिकृत व्यवहारांची सखोल चौकशी करावी. सदर रक्कम कोणत्या व्यक्तीने, कोणत्या माध्यमातून, कोणत्या खात्यात अथवा कोणत्या लाभार्थ्याकडे हस्तांतरित केली, याचा तपास करून संबंधितांची ओळख पटवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.CCTV व इलेक्ट्रॉनिक नोंदी तपासण्याची मागणीया प्रकरणाशी संबंधित बँक रेकॉर्ड, व्यवहारांची माहिती, इलेक्ट्रॉनिक नोंदी, उपलब्ध CCTV फुटेज, मोबाईल क्रमांक बदलाची नोंद व इतर आवश्यक डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची तपासणी करावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.परवानगीशिवाय खात्यातून रक्कम काढणाऱ्या अथवा हस्तांतरित करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच खात्यातून अनधिकृतपणे गेलेल्या रु. 8 लाख 73 हजारांचा मागोवा घेऊन ती रक्कम परत मिळविण्यासाठी संबंधित बँक व सक्षम यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी शुभम दशरथ ढवळे यांनी केली आहे.तपासादरम्यान बँकेतील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग, निष्काळजीपणा अथवा अनधिकृत मदत आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्धही नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.‘बँकेने मेसेज दिला होता, मात्र ते बँकेत आले नाहीत’
या प्रकरणी शुभम दशरथ ढवळे यांनी सावनेर पोलीस ठाणे तसेच बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेचे व्यवस्थापक कृपाल चौधरी आदींकडे तक्रार केली आहे. आयुष्यभराच्या कष्टाची व मेहनतीची रक्कम परवानगीशिवाय काढली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या प्रकरणाची तातडीने व गांभीर्याने चौकशी करून दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच रक्कम परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी खातेदाराने केली आहे.





