सावनेर :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे आणि CENTA यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सावनेर येथे शिक्षकांसाठी Teacher Need Assessment (TNA) चे यशस्वी आयोजन शनिवार दिनांक ८ ऑगस्ट ला करण्यात आले. सावनेर तालुक्यातील ७५ शिक्षकांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी ७१ शिक्षकांनी गुगल लिंक आधारित ऑनलाइन चाचणीद्वारे यशस्वीपणे सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील १३ तालुक्यांची SCERT, पुणे यांच्याकडून TNA साठी निवड करण्यात आली असून, त्यामध्ये सावनेर तालुक्याचा समावेश आहे. शिक्षकांच्या अध्यापनविषयक गरजा, कौशल्ये आणि व्यावसायिक विकासाच्या आवश्यकता जाणून घेण्यासाठी घेण्यात आलेल्या या चाचणीत ४० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर आणि गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभाग, पंचायत समिती सावनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम मुंडे, जितेंद्र ठाकरे तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय साधनव्यक्ती, विशेष शिक्षक यांनी TNA साठी प्रभावी नियोजन केले. शिक्षकांसाठी शिस्तबद्ध बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आवश्यक सूचना तसेच तांत्रिक सहकार्याची व्यवस्था करण्यात आली.
TNA चाचणीसाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहकार्य गट साधन केंद्र, सावनेर येथील सर्व विषय साधन व्यक्तींनी वैयक्तिकरित्या केले. ऑनलाइन चाचणीदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करून शिक्षकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण चाचणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या गरजा अधिक अचूकपणे ओळखून भविष्यात गरजाधारित व परिणामकारक शिक्षक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी TNA उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





