नागपूर, ५ – नागपूर शहरात सोमवारी दुपारी एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली. यशवंत रमेश शाहू (वय अंदाजे ३०), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी मानकापूर क्रीडा संकुलासमोरील उड्डाणपुलावरून उडी घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत शाहू यांनी आपली दुचाकी उड्डाणपुलावर थांबवली आणि काही क्षण तिथे उभे राहून अचानक उडी घेतली. पुलावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
मृतक यशवंत शाहू हे जरीपटका परिसरातील कुकरेजा नगर येथे राहत होते. ते नागपूर होमगार्ड विभागात कार्यरत होते आणि मेस्को या खासगी संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत होते. घटनास्थळी आत्महत्येपूर्वीची कोणतीही चिठ्ठी आढळली नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं, याबाबत सध्या तरी अंधार आहे.
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याशिवाय उड्डाणपुलासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरु करण्यात आली आहे. पोलिसांकडून मृतकाच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात असून, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा आर्थिक अडचणींचा तपास घेतला जात आहे.
दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी घडलेला हा प्रकार अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर मानसिक आरोग्याच्या विषयावर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मानसिक तणाव, सामाजिक दबाव आणि आर्थिक संकटांमुळे अनेकजण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याने प्रशासनाने या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.








