spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महास्ट्राईड अंतर्गत जिल्हा प्रशासन व एचसीएलटेकमध्ये ‘टेकबी’ कार्यक्रमासाठी सामंजस्य करार

– ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही संधी पोहोचवावी – सहपालकमंत्री

– गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराची संधी

– राज्यात जिल्हास्तरावर असा करार करणारा गडचिरोली पहिला जिल्हा

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासोबत उच्च शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महास्ट्राईड’ उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन आणि एचसीएलटेक ट्रेनिंग अँड स्टाफिंग सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात ‘टेकबी’ कार्यक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व एचसीएलटेकच्या प्रतिनिधींमध्ये हा करार झाला. महाराष्ट्रात जिल्हास्तरावर अशा स्वरूपाचा करार करणारा गडचिरोली हा पहिला जिल्हा ठरला आहे.

“जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही संधी पोहोचवावी. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य जिल्हा तसेच राज्यस्तरावर करण्यात येईल,” असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून पात्र विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या. महास्ट्राईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे आणि त्यांची कौशल्ये उद्योगांच्या गरजांशी सुसंगत करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

एचसीएलटेकच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ‘टेकबी’ हा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीचा प्रारंभिक करिअर कार्यक्रम आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे १२ महिन्यांचे वर्ग प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना एचसीएलटेकमध्ये पूर्णवेळ रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. पात्र विद्यार्थ्यांना सुमारे अडीच लाख रुपयांच्या वार्षिक वेतनापासून रोजगाराची संधी असल्याची माहितीही प्रतिनिधींनी दिली.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगारासोबतच आयआयटी गुवाहाटी, बिट्स पिलानी, आयआयआयटी कोट्टायम आणि आयआयएम सिरमौर यांसारख्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराशी जोडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महास्ट्राईड आणि एचसीएलटेक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

याप्रसंगी आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles