खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील खुबाळा येथे विहिरीत बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजेश पंढरी डोंगरे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डोंगरे हा अविवाहित असून आपल्या आई-वडिलांसोबत खुबाळा येथे राहत होता. गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) तो गावात मिस्त्री कामासाठी गेला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास तो गावात अस्वस्थ अवस्थेत फिरत असल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी घरी परत येऊन त्याचा शोध घेतला.
यावेळी गावातील एका महिलेने राजेश याला शेतातील विहिरीत उडी घेताना पाहिल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत गळाच्या सहाय्याने शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी राजेशचा मृतदेह विहिरीतील पाण्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व आवश्यक पोलीस कारवाई केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी मृतकाचे वडील पंढरी महादेव डोंगरे यांच्या तोंडी अहवालावरून खापा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार विशाल महालकर करीत आहेत. राजेशने विहिरीत उडी घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याबाबत कोणावरही संशय नसल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.








