किशोर साहू, मौदा :- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा हातात घेऊन सायकलवरून निघालेल्या विद्यार्थ्यांनी देशप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीचा अनोखा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
“सायकल चालवा, प्रदूषण टाळा; निसर्ग वाचवा, देश घडवा!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सायकल हे पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन असून त्यातून इंधनाची बचत, वायुप्रदूषणात घट आणि शारीरिक व्यायाम असे अनेक फायदे होतात, हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिक्षक निलेश जाधव यांनी रॅलीचे नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच ‘माझा देश – माझी जबाबदारी, माझा निसर्ग – माझी जबाबदारी’ ही जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
या रॅलीत पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा, सायकली आणि पर्यावरणपूरक संदेश यामुळे गावातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. विद्यार्थ्यांनी दिलेला हा संदेश केवळ रॅलीपुरता मर्यादित न राहता प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मनापर्यंत पोहोचावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘हर घर तिरंगा’सोबत हर घर पर्यावरणप्रेमी होऊ दे, प्रत्येक सायकलच्या चाकातून स्वच्छ भारताचा संकल्प घडू दे!
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाला पर्यावरणप्रेमाची जोड देणारा हा अभिनव उपक्रम गावकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.








