– ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण; चिमुकल्यांनी साकारल्या स्वातंत्र्यवीरांच्या यशोगाथा
कामठी :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हरदास विद्यालय आणि ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याची शपथ घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तिपर कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
हरदास विद्यालय व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, प्रेरणादायी भाषणे, नृत्य, योगासने व योगप्रदर्शन, सैनिकांच्या शौर्यावर आधारित नाटिका तसेच थरारक मानवी मनोरा सादर केला. विशेषतः चिमुकल्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत साकारलेल्या भूमिका आणि त्यांच्या शौर्यगाथांचे केलेले सादरीकरण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. सुलेखा कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व योगदान कधीही विसरू नये, असे आवाहन केले. शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि देशाप्रती जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, हरदास विद्यालय तसेच ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला अजय कदम, नियाज कुरेशी, उदास बंसोड, आकाश बोकरे, सुभाष सोमकुवर, दीपक सिरीया, चंदू लांजेवार, दिपंकर गणवीर, अनुभव पाटील, अंकुश बांबोर्डे, विलास बंसोड, विनय बांबोर्डे, सागर भावे, रेखा भावे, रजनी लिंगायत, सुनील वानखेडे, राजेश शंभरकर, चंदू कापसे, सचिन नेवारे, वंदना आळे, शालू सावतकर, सुमन घरडे, हरदास विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र जगताप, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अंबरीन फातिमा, विनोद जुमडे, प्रफुल वासे, अरविंद वाळके, सुकेशिनी मुरारकर, विशाखा पाटील, निशा कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जोश आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची प्रेरणा यामुळे हा स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.








