– १२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
– राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ टक्के जागांवर ‘महाज्योती’ची मोहोर
बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट-ब दुय्यम सेवा २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक (स्टेट टॅक्स इन्सपेक्टर) आणि दुय्यम निबंधक (सब रजिस्ट्रार) मुख्य परीक्षेच्या निकालात ‘महाज्योती’च्या तब्बल १२३ बहुजन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. राज्य कर निरीक्षक पदाच्या एकूण २८० जागांपैकी १०१ विद्यार्थी ‘महाज्योती’चे असून, एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये त्यांचा वाटा तब्बल ३५ टक्के आहे. तर दुय्यम निबंधक पदाच्या ८४ जागांपैकी २२ विद्यार्थी ‘महाज्योती’चे असून, या पदातील त्यांचा वाटा २५ टक्के आहे. दोन्ही पदांमध्ये मिळून १२३ विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश संस्थेच्या प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची प्रभावीता अधोरेखित करणारे ठरत असल्याचे मत ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केले.
पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यातही ‘महाज्योती’चे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतील, असा विश्वास ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली ‘महाज्योती’ ही स्वायत्त संस्था गेल्या सात वर्षांपासून बहुजन विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. या प्रयत्नांमुळे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या यशाची व्याप्ती वाढत असून, प्रशासनातील विविध सेवांमध्ये त्यांचा सहभागही वाढत आहे. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील अराजपत्रित परीक्षेच्या जानेवारीत महिन्यात जाहीर झालेल्या अंतिम निकालातही ‘महाज्योती’च्या १५० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मिळणारे हे यश उद्दिष्टपूर्तीची दिशा स्पष्ट करणारे असल्याचेही मिलिंद नारिंगे यांनी सांगितले.
प्रशासनात बहुजन तरुणांचा वाढता सहभाग अभिमानास्पद : अतुल सावे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब परीक्षेत ‘महाज्योती’च्या १२३ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. बहुजन समाजातील गुणवंत तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शनाची योग्य दारे उघडी करून देणे हेच ‘महाज्योती’चे मूळ उद्दिष्ट आहे. राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ टक्के जागांवर ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी मारलेली धडक ही राज्य शासनाच्या कल्याणकारी धोरणांची आणि संस्थेच्या प्रभावी मार्गदर्शनाची पावती आहे. ग्रामीण व सर्वसामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. भविष्यातही राज्यातील एकाही बहुजन विद्यार्थ्याचे स्वप्न आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे अपूर्ण राहणार नाही, यासाठी शासन आणि महाज्योती संस्था पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रशासकीय प्रवासासाठी उदंड शुभेच्छा, असे मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.





