spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्य महोत्सव गणेशोत्सवासाठी सर्व विभागांचा सहभाग आवश्यक – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

· राज्यभर विविध उपक्रम राबविण्यासाठी शासन निर्णय जारी

मुंबई :- गणेशोत्सव हा राज्याचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालये, आस्थापना आणि महामंडळांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. गावापासून शहरापर्यंत गणेशोत्सवाचा व्यापक सहभाग वाढविण्यासोबतच या उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील 480 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे दीड कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात येईल. तालुका व जिल्हास्तरीय द्वितीय आणि तृतीय विजेत्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत समारंभ आयोजित केले जातील.

गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेरील 10 राज्ये आणि भारताबाहेरील एका देशात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नवी दिल्ली येथे पाच दिवस, तर मुंबईत आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यात येईल.

प्रमुख गणेश मंदिरे व सार्वजनिक गणेशोत्सवांचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मही तयार केला जाईल. गणेशोत्सवाचा इतिहास, परंपरा, अष्टविनायक, पर्यावरणपूरक उत्सव आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून व्यापकपणे प्रसारित केली जाणार आहे. ‘राज्य महोत्सव’चा लोगो शासनाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.

दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्या माध्यमातून गणपतीविषयक रील्स स्पर्धा महसूल विभागीय आणि राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा व प्रथांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटाचाही गौरव केला जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर

शाडूच्या मातीच्या मूर्ती, बीज गणपती, निर्माल्य संकलन व पुनर्वापर, प्लास्टिकमुक्त उत्सव, एलईडी सजावट आणि सौरऊर्जेवरील मंडप याबाबत राज्यभर जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आणि कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याचे उपक्रम राबविण्यात येतील. जलस्रोतांना बाधा होणार नाही, याची दक्षता घेत जलसंवर्धनाबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून दुर्वा, फुले, नैवेद्य साहित्य व सेंद्रिय कृषी उत्पादनांची माहिती प्रसारित केली जाईल. महिला बचतगट व सहकारी संस्थांना मोदक, प्रसाद साहित्य व स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. गणेशमूर्ती, मखर, सजावट व पूजासाहित्य तयार करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह कारागिरांसाठीही प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातील.

युवकांसाठी शाडूच्या मूर्ती, मखर, सजावट व डिजिटल डिझाइनवर आधारित उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. शाळांमध्ये शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळा, निबंध, वक्तृत्व व सांस्कृतिक उपक्रम, तर महाविद्यालयांमध्ये ‘गणेश आणि विज्ञान’ या विषयावर परिसंवाद, व्याख्याने व नवोपक्रम प्रदर्शने आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण रोबोटिक्स देखावे आणि पर्यावरणपूरक सजावटीबाबत जनजागृती करण्यात येईल.

आरोग्य, सुरक्षितता व सर्वसमावेशकतेला प्राधान्य

गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि हृदयविकाराच्या प्रसंगी प्रथमोपचारासाठी सीपीआर प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैद्यकीय मदत केंद्रे, स्वयंसेवक, अन्नसुरक्षा तपासणी आणि भेसळ प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दिव्यांग भाविकांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती, स्पर्शदर्शन व सुलभ प्रवेशाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी तालुका व जिल्हास्तरीय समित्या गठित करून प्रत्यक्ष भेटीद्वारे अर्जांची तपासणी, गुणांकन आणि अंतिम निकालाची कार्यवाही करावी. प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणुकांचे संयोजन, स्थानिक कार्यक्रमांचे नियंत्रण व प्रसिद्धीची जबाबदारीही जिल्हाधिकारी कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. गृह विभागाने उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन करावे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने विसर्जन मार्ग, दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षित पादचारी सुविधांची दक्षता घ्यावी.

विविध स्पर्धांच्या समन्वयाची जबाबदारी संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकादमी, मुंबई यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रालयीन विभाग व कार्यालयांमार्फत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समन्वयासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक सूचना जारी करून राज्य महोत्सव गणेशोत्सवातील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.