spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपंचमी निमित्त जि प प्राथमिक शाळा तोंडली येथे विविध उपक्रमांचे आयोजन

किशोर साहू, मौदा  :- नागपंचमीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, कलात्मक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पाटीवर नागाचे चित्र व सरस्वतीचे चित्र रेखाटले तसेच टाकाऊ कागदापासून आकर्षक नाग तयार करून आपल्या कलागुणांना वाव दिला.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्पमित्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी सापांविषयी विविध प्रश्न विचारून त्यांच्या जीवनाविषयी, सवयींविषयी, विषारी व बिनविषारी सापांच्या जाती तसेच निसर्गातील त्यांच्या महत्त्वपूर्ण स्थानाविषयी माहिती जाणून घेतली.

शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. साप हा निसर्गातील एक महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सर्पदंशाची घटना घडल्यास कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवर्जून सांगण्यात आले.

नागपंचमी सणाचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगतानाच सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापांकडे पाहण्याचा आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व समजून घेण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांच्यामध्ये पर्यावरणप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्पसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली.

Popular Articles